फरार पोलीस शिपायाला नांदेड जिल्ह्यातील मारतळा येथून अटक – VastavNEWSLive.com


नांदेड (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे याला अखेर नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या २० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीच्या अकोला पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी: बाळापूर येथे भाड्याने राहत असलेल्या पवन वडगावे याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने संबंधित मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी १२ जुलै रोजी बाळापूर जिल्हा अकोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४, १०८ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासाची आव्हाने: गुन्हा दाखल होताच आरोपी पवन वडगावे फरार झाला होता. तो स्वतः पोलीस दलात कार्यरत असल्याने त्याला तपासाच्या तांत्रिक पद्धतींची पूर्ण माहिती होती, त्यामुळे त्याला शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ५ विशेष पथके तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये २५ पोलीस अंमलदार आणि ६ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

चार राज्यांत शोधमोहीम: आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक अशा चार राज्यांमध्ये तपास केला. हैदराबाद, कोईम्बतूर, बंगळुरू, मुंबई आणि हिंगोली या शहरांमध्ये ही शोधमोहीम राबवण्यात आली होती. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यातील मारतळा येथून त्याला ताब्यात घेऊन अकोल्यात आणण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि एसडीपीओ गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांनी यशस्वीपणे पूर्ण केली.


Post Views: 153






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *