मेळघाटात 'ट्रॅक ॲण्ड ट्रेल'ने पर्यटन विकासाला चालना:जिल्हाधिकारी येरेकर यांची ॲडव्हेंचर क्लबसोबत चर्चा, नवीन मार्ग शोधण्याचे निर्देश




मेळघाटातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या पर्यटकांसाठी सध्याच्या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त जंगल भ्रमंती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी ‘ट्रॅक ॲण्ड ट्रेल’साठी नवीन मार्ग शोधले जातील, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी म्हटले आहे. मेळघाट ॲडव्हेंचर क्लबने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाटातील पर्यटनाबाबत सादरीकरण केले. विदर्भातील वन पर्यटनासाठी मेळघाट हा एक उत्तम पर्याय आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच विविध पर्यटन पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामध्ये जंगल सफारी, साहसी पर्यटन आणि जंगल भ्रमंतीचा समावेश आहे. वन विभागाने पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेकिंगसाठी योग्य मार्ग निवडावेत. आवश्यकतेनुसार या ठिकाणी स्वतंत्र प्रवेशद्वार उभारण्यात यावे. अशा प्रकारचे विविध पर्याय दिल्यास पर्यटक मेळघाटात अधिक काळ थांबण्यास प्रवृत्त होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी युवकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यामार्फत समाजमाध्यमांवरून मेळघाटाची माहिती प्रसारित करावी. यामुळे मेळघाटाबद्दल अधिक माहिती पोहोचण्यास मदत होईल. शालेय विद्यार्थी आणि समूहाने येणाऱ्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी निवास, फिरणे आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था उच्च दर्जाची असावी, तसेच स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखला जावा. सेमाडोह आणि कोलकास येथील निवास व्यवस्था आणि त्यांची देखभाल, दुरुस्ती सातत्याने करावी. इतर ठिकाणी तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचा पर्यायही तपासून पाहण्यात यावा. आमझरी येथे साहसी खेळांची सोय करण्यात आली असून, तेथेही पर्यटक येतील याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुविधा आणि सवलती दिल्यास पर्यटकांचा मेळघाटातील पर्यटनाकडे कल वाढू शकेल. यासाठी पर्यटनाचे क्षेत्र विस्तारण्याची गरज आहे. धबधबे आणि ऐतिहासिक वास्तू ही केंद्रे ठरवून पर्यटकांना तेथे पायी नेण्यासाठी मार्ग तयार करावेत. या वाटेत नाश्ता, जेवण आदी व्यवस्था झाल्यास पर्यटकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकेल. वन विभागाने पर्यटकांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच जंगल भ्रमंतीसाठी रस्ते शोधावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी येरेकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *