![]()
पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून एका संगणक अभियंता तरुणीची ४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी वडगाव शेरीतील सोमनाथनगर येथे राहते. ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहे. तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. फेब्रुवारी महिन्यात आरोपीने याच संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधला. त्याने तरुणीकडे विवाहाबाबत विचारणा केली आणि स्वतः रशियातील मॉस्को शहरात नोकरी करत असल्याची बतावणी केली. आरोपीने तरुणीच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधून विवाहाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तरुणी आणि आरोपी यांच्यात मोबाइलवर नियमित संवाद सुरू झाला. काही दिवसांपूर्वी आरोपीने छातीत दुखत असल्याची बतावणी करत, ‘माझा पगार झाला नाही, तातडीने पैशांची गरज आहे’ असे सांगून तरुणीला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तरुणीने कोणतीही शहानिशा न करता आरोपीच्या बँक खात्यात ४ लाख ३५ हजार रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने आपला मोबाइल क्रमांक बंद करून तरुणीशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अमोल धस पुढील तपास करत आहेत. महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची आर्थिक फसवणूक मुलाला पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश रोहिदास जाधव (रा. पिंपरी-चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात राहायला आहेत. आरोपीशी त्यांची २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तक्रारदाराच्या मुलाला पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी साडेअकरा लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांच्या मुलाला नोकरी लावून दिली नाही. त्यामुुळे त्यांनी आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली. आरोपीने त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यानंतर आरोपीने त्यांना ५० हजार रुपये परत केले. उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस कांगणे तपास करत आहेत.
विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची फसवणूक:साडेचार लाखांची फसवणूक, चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल
