![]()
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगपुरा परिसरातील सावित्रीबाई फुले भाजीमंडईचे अखेर 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण झाले आहे. बुधवारी (22 जुलै) दुपारी 1 वाजता मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या नूतन भाजीमंडईचे उद्घाटन करण्यात आले. ही मंडई ‘बीओटी’ (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर उभारण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रदीप जैस्वाल, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता गोविंद केंद्रे आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. नवीन इमारतीत एकूण 35 व्यावसायिक गाळे आणि 140 ओटे (प्लॅटफॉर्म) आहेत. जुन्या भाजीपाला विक्रेत्यांना याच इमारतीत सामावून घेण्याचे ठरले होते. मात्र, गेल्या 14 वर्षांच्या काळात अनेक जुन्या विक्रेत्यांचे निधन झाले. सध्या केवळ 48 मूळ ओटेधारकच समोर आले आहेत.
त्यामुळे उर्वरित ओटे आणि 20 गाळ्यांच्या वाटपाचा धोरणात्मक निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. या मंडईत एक प्रशस्त हॉल देखील तयार करण्यात आला आहे. औरंगपुरा येथील मूळ भाजीमंडई 1977 साली सुरू झाली होती.
इमारत जीर्ण झाल्याने, ती पाडून ‘बीओटी’ तत्त्वावर बहुमजली संकुल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. 2011 मध्ये जुनी मंडई पाडण्यात आली आणि 2013 मध्ये ‘पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला संकुलाचे काम देण्यात आले. मात्र, विविध कारणांनी आणि वादामुळे हे काम रखडले होते.
