![]()
आम्ही एनडीएसोबतच राहणार आहोत आणि सोबतच पुढे जाणार असल्याचे विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेक घडामोडी घडल्या, त्यात आता दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, आमची भूमिका स्वच्छ आहे. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत असा निर्णय करत आहोत. राष्ट्रवादी पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण निवडायचा हा राष्ट्रवादीचा अधिकार आहे. तसेच विलीनीकरणाच्या संदर्भात मी अनेकवेळा स्पष्ट केले आहे की एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम सोबत राहणार आहोत. दादा असताना सुद्धा मी हे वक्तव्य केले आहे आणि हे सर्वज्ञात आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाच्या संदर्भात बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विलीनीकरणाच्या संदर्भात मीडिया का चर्चा करत आहे? हा विषय कौटुंबिक विषय आहे. तसेच कुटुंबात आमचे वहिनीशी किंवा कोणाशीही आमचे बोलणे झाले नाही. मर्जरमध्ये काय अटी शर्थी आहेत, याविषयी देखील आमची काही चर्चा झालेली नाही. आमची जोपर्यंत बैठक होत नाही, पवार कुटुंबाशी आमची चर्चा होत नाही, तोपर्यंत यावर बोलणे योग्य नसल्याचे मत कोकाटे यांनी व्यक्त केले आहे. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो विलीनीकरणाची चर्चा झाली- शशिकांत शिंदे दरम्यान, अजित दादांची शपथ घेऊन मी सांगतो की विलीनीकरणाची चर्चा झाली होती, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले, एक सत्य बोलणे गरजेचे आहे. यात काही राजकीय हेतू आमचा नव्हता. तसेच माणूस गेल्यावर तर कोणी खोटी शपथ घेऊ शकत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले. आम्हाला राजकारण करायचे नाही, नाहीतर अनेक गोष्टी मी सांगू शकतो- देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, अजितदादा अशा प्रकारची चर्चा करत होते, तर ती चर्चा ते एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? ते काय सरकारमधून बाहेर पडणार होते का? अजितदादा सरकारमध्ये स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचे आणि आपली इकोसिस्टम वापरुन ते कन्फ्युजन इको करायचे, ही पद्धत अयोग्य आहे. आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचे नाहीये. नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो, काय घडले आहे, काय घडत आहे. मला सगळे दिसत आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्हालाही माहित आहे, माझे आणि अजितदादांचे संबंध कसे होते, ते सगळं माझ्यासोबत शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असे वाटते की खालच्या स्तरावरचे राजकारण करणे योग्य नाही.
आम्ही एनडीएसोबतच राहणार आहोत:सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर स्पष्टच बोलले; माणिकराव कोकाटेंनीही दिली प्रतिक्रिया
