नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रामतीर्थ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुखेड–नरसी रोडवर एमएच 26 सीव्ही 9555 क्रमांकाच्या हायवा टिपरमधून विनापरवाना रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन अडवले. चालकाने आपले नाव सहदेव एकनाथ ढगे (रा. महाटी, ता. मुदखेड) असे सांगितले. त्याच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा रॉयल्टीची कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.यानंतर पंचांसमक्ष पंचनामा करून अंदाजे 5 ब्रास काळी रेती (सुमारे ₹20 हजार) तसेच ₹40 लाख किंमतीचा हायवा टिपर असा एकूण ₹40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 149/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे व रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
