दोन जबरी चोऱ्या, दोन घरफोड्या आणि एक चोरी; 3 लाख 72 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात 2 लाख 27 हजार 244 रुपयांच्या दोन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. तसेच 1 लाख 44 हजार 500 रुपयांच्या तीन घरफोड्या घडल्या आहेत. जबरी चोऱ्या आणि घरफोड्या या प्रकरात एकूण 3 लाख 71 हजार 941 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये राहणाऱ्या सरला विनोद धुत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारीच्या सकाळी 6.30 वाजता त्या घरासमोरचे अंगन झाडत असतांना दोन अनोळखी व्यक्ती आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण 60 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 8/2025 क्रमांकावर दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे करीत आहेत.
स्वतंत्र फायनान्स शाखा नरसी येथील फिल्ड ऑफीसर चंद्रमनी दिगंबर धतुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.8 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे मित्र आपल्या दुचाकी गाडीवरून नायगाव तालुक्यातील धुप्पा गावाजवळ पोहचले. त्यावेळी अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्यासमोर त्यांची दुचाकी आडवी लावून चाकुने गंभीर वार करून धतुरेकडील 1 लाख 44 हजार 241 रुपये, मोबाईल 23 हजार रुपयांचा असा 1 लाख 67 हजार 241 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. त्यांनी हे पैसे बचत गटाच्या कर्जाची वसुली करून आणले होते.
इंदुबाई शिवाजी कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जानेवारीच्या रात्री 11 ते 6 जानेवारीच्या पहाटे 6 वाजेदरम्यान व्यंकटेशनगर उमरी येथील त्यांच्या घरात बळजबरीने शिरुन एकाने त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा 50 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. उमरी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 8/2025 नुसार नोंदवली आहे. पोलीस अंमलदार गेडाम अधिक तपास करीत आहेत.
व्यंकटेश पुरुषोत्तम कवटीकवार यांचे मौजे गडगा येथे गोदावरी बिअर बार आहे. दि.8 जानेवारीला त्यांनी दिवसभर दारुच्या व्यवसायातून जमा झालेली 59 हजार 500 रुपये एवढी रोख रक्कम मौजे गडगा येथील आपल्या बारमधील कॉन्टरमध्ये ठेेवून घरी गेले. त्यानंतर कोणी तरी चोरट्यांनी ती 59 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 8/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गेडाम करीत आहेत.
शांताबाई मारोती पिदके या 50 वर्षीय महिला 8 जानेेवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्यासुमारास बिलोली बसस्थानकात बिलोली ते देगलूर बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 7 पानांचे मनीमंगळसुत्र 35 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. बिलोली पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 6/2025 नुसार नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार मुद्देमवार हे करीत आहेत