रायगडच्या आरव्ही बीचवर थरार!:पुण्याच्या पर्यटकांची कार समुद्रात अडकली; जेसीबीने काढले बाहेर, सुदैवाने चौघेही सुखरूप




पर्यटनाचा आनंद घेताना अनेकदा पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते आणि हाच अतिउत्साह कसा अंगलट येऊ शकतो, याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आला आहे. पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार चक्क समुद्राच्या लाटांमध्ये अडकून वाहून गेल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धनमधील आरव्ही बीचवर घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, गाडीतील चारही पर्यटक सुखरूप बचावले आहेत. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी जारी केला आहे. अतिउत्साह पडला महागात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चार जण रायगडमधील श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आले होते. फिरताना ते आरव्ही बीचवर पोहोचले. यावेळी केवळ पायी फिरण्याऐवजी या पर्यटकांनी आपली कार थेट समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत नेली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि समुद्राच्या लाटांचा जोर वाढल्याने त्यांची कार वाळूत फसली आणि समुद्राच्या पाण्यात अडकली. पाण्याच्या प्रवाहामुळे कार समुद्रात वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जेसीबीच्या मदतीने कार बाहेर काढली कार समुद्राच्या लाटांमध्ये अडकल्याचे पाहताच पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बचावकार्यासाठी तात्काळ एक ‘जेसीबी’ मशीन घटनास्थळी पाचारण करण्यात आले. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जेसीबीला दोरखंड बांधून लाटांमध्ये अडकलेली ही कार अत्यंत शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पाण्यात कार अडकली तेव्हा गाडीतील चारही पर्यटकांनी वेळीच प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि मोठी जीवितहानी टळली. पोलिसांचे पर्यटकांना आवाहन या घटनेचा व्हिडीओ पोलिसांकडून समोर आला असून, समुद्राच्या लाटांमध्ये अडकलेली कार आणि तिला बाहेर काढण्याचा स्पष्टपणे दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेण्यास सक्त मनाई असतानाही पर्यटक नियम मोडतात, ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेऊ नयेत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रायगड पोलिसांकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग:विदर्भासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD चा यलो अलर्ट राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *