सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मद्रे येथे दीड कोटींचा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, दारू माफियांचे धाबे दणाणले

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-01-26t213814804_1769443623.jpg




सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धडक कारवाई करत तो उध्वस्त केला आहे. संशयित आरोपी राजू टिळेकर याच्या मालकीच्या गट क्र. 122 (2) मधील पत्र्याच्या शेडमध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता, जिथून पोलिसांनी वाहनासह तब्बल दीड कोटी रुपयांची बनावट देशी दारू आणि रसायनांचा साठा जप्त केला आहे. या ठिकाणी रॉकेट संत्रा, प्रवरा, भिंगरी, कोंकण प्रिमियम आणि टँगो पंच यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाने बनावट मद्य तयार करण्याचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर आढळले असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 जानेवारी रोजी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी गस्तीवर असलेल्या वळसंग पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे हा बनावट दारूचा कारखाना उघडकीस आला. मद्रे ते आहेरवाडी रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना त्यांना राजू टिळेकर यांच्या बांधकामाधीन क्षेत्राजवळ एक ‘आयशर’ टेम्पो संशयास्पद स्थितीत उभी असलेली दिसली. पोलिसांना या टेम्पोच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ तिथे धाव घेत तपासणी केली आणि त्यातून या दीड कोटींच्या बनावट दारू साठ्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांना पाहताच आरोपींनी काढला पळ पोलिसांना पाहताच टेम्पोजवळ असलेले 3 ते 4 संशयित इसम तिथून पळून गेले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्या ठिकाणच्या पत्र्याच्या गोदामाची झडती घेतली असता, तिथे कोणत्याही परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या कारवाईमुळे या निर्जन स्थळी दडून सुरू असलेल्या एका मोठ्या बेकायदेशीर उद्योगाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 1 कोटी 54 लाख 9 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त वळसंग पोलिसांनी या प्रकरणी मद्रे येथील राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर आणि धुळ्यातील दिनू शेठ उर्फ भूषण पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून एकूण 1 कोटी 54 लाख 9 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो, दारू बनवण्याची 4 स्वयंचलित मशिने, कच्च्या रसायनाचे 122 बॅरल (प्रत्येकी 250 लिटर), रिकाम्या बाटल्या, झाकणे आणि विविध कंपन्यांचे बनावट लेबल्स हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, टॅगो पंच, रॉकेट आणि कोंकण प्रिमियम यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे सुमारे 1400 तयार बॉक्सही जप्त करण्यात आले असून, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या अवैध कारखान्याचा पर्दाफाश केल्याने बनावट दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed