दर्शनाहून परतताना पाण्याचा मोह आवरला नाही; दोन मित्रांचा मृत्यू:कोलठाण शिवारातील घटना; मृत संभाजीनगरच्या चिकलठाणा येथील‎




प्रतिनिधी | फुलंब्री खाटूश्याम बाबांचे दर्शन घेऊन परतताना पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोलठाण शिवारात मंगळवारी दुपारी घडली. सचिन गजानन वराडे (२१) आणि समर्थ बाबासाहेब चितळे (१६) अशी मृतांची नावे असून दोघेही चिकलठाणा येथील सावित्रीनगर परिसरातील रहिवासी होते. मंगळवारी सकाळी आठ मित्र दुचाकीवरून संभाजीनगर तालुक्यातील खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. सचिन वराडे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो गॅरेजवर काम करत होता. वडील ट्रॅक्टरचालक आहेत. कुटुंबात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. कष्टाने संसार उभा करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच सावित्रीनगर परिसरावर शोककळा पसरली. दोन उमलत्या जीवांचा असा अकाली अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. समर्थ देत होता परीक्षा समर्थ हा मूळचा चाकेगाव (ता. पाथर्डी) येथील असून मागील वर्षभरापासून चिकलठाणा येथे मामाच्या घरी राहत होता. तो राजर्षी शाहू विद्यालयात दहावीचा विद्यार्थी होता. सोमवारीच त्याने दहावीचा पेपर दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *