काकांच्या पावलावर पुतण्याचे पाऊल:रोहित पवार दर मंगळवारी 'जनता दरबार' भरवणार, अजित पवारांचा वारसा कायम ठेवणार




आमदार रोहित पवार यांनी आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली स्वीकारत त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे ठरवले आहे. विधानसभेत अजित पवारांच्या आठवणीने भावुक झालेले रोहित पवार आता दर मंगळवारी ‘जनता दरबार’ भरवून जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ते केवळ सर्वसामान्यांचे प्रश्नच नव्हे, तर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणीही थेट समजून घेणार आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत पत्रक काढून या निर्णयाची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस असलेले रोहित पवार उद्या, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत मुंबईतील प्रदेश कार्यालयात आपला पहिला जनता दरबार भरवणार आहेत. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाचा काळ संपल्यानंतर, हा जनता दरबार दर मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत नियमितपणे आयोजित केला जाईल. लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी रोहित पवार यांनी घेतलेला हा पुढाकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या कामाची शिस्त आणि नियमात बसणारी लोककामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होती. शरद पवार यांच्याकडून मिळालेला हा वारसा जपत अजित पवार दर मंगळवारी ‘जनता दरबार’ भरवून सर्वसामान्यांचे प्रश्न तत्परतेने सोडवत असत. आता हाच लोकसंपर्काचा वारसा पुढे नेत आमदार रोहित पवार यांनीही दर मंगळवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला असून, या माध्यमातून ते कार्यकर्ते आणि जनतेच्या अडचणी थेट जाणून घेणार आहेत. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना आमदार रोहित पवार विधिमंडळात कमालीचे भावुक झाले होते. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांत चार पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या तपासावर संशय व्यक्त करणाऱ्या रोहित पवारांनी, या प्रकरणाची सखोल आणि योग्य दिशेने चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे. या अपघातामागील सत्य समोर येण्यासाठी त्यांनी थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने आता या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *