मोठे आकडे नकोत, प्रत्यक्ष रोजगार दाखवा:कर्नाटक पुढे कसे गेले?, दावोस MoU वर पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल




दावोस दौऱ्यावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यातील हजारो कोटींच्या सामंजस्य करारांवर (MoU) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नसल्याचे मान्य करतानाच, जर खरोखर 30 लाख कोटी रुपयांचे MoU झाले असतील, तर ती आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, केवळ मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत, सत्य शेवटी समोर येतेच, असा इशाराही त्यांनी दिला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक आवश्यक असली, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले, किती गुंतवणूक आली आणि त्यातून किती रोजगारनिर्मिती झाली, याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मागील दावोस दौऱ्यात करण्यात आलेल्या MoU पैकी किती करार प्रत्यक्षात उतरले, यावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी, असे आवाहन करत, दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर स्थानिक उद्योगांशी करार करणे योग्य आहे का, यावरही त्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना इव्हेंट नव्हे, तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष रोजगार हवा आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. नेमके चव्हाणांची पोस्ट काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. मागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दावोस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे.महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत.आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *