धनंजय मुंडेंचा वाढदिवस साधेपणाने:जल्लोषाला नकार, कार्यकर्त्यांना 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन




माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी 15 जुलै रोजी होणारा आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी वाढदिवसानिमित्त उत्सवाऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जीवनात काही क्षण असे असतात की, ते कोणताही उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजाप्रति असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकाकुल आहे. जनतेसाठी अखंड झटणारा आणि विकासाला दिशा देणारा मोठा नेता आपण गमावला असून, त्यांच्या आठवणींना अभिवादन करत असताना कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करणे मनाला पटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच परळी विधानसभा मतदारसंघासह परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या वेदनादायी परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करणे योग्य वाटत नसल्याचे सांगत त्यांनी 15 जुलै रोजी कोणतेही बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका किंवा इतर उत्सवी कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी कळकळीची विनंती केली आहे. समाजसेवेच्या पाच उपक्रमांचे आवाहन वाढदिवस साजरा करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करावे, असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी पाच उपक्रम सुचवले आहेत. धनंजय मुंडे यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्यासाठी वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजाचे ऋण फेडण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांनी केलेला प्रत्येक समाजोपयोगी उपक्रम, मदतीचा प्रत्येक हात आणि सेवाभावातून केलेले प्रत्येक कार्य हीच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान भेट असेल. समाजसेवेच्या माध्यमातून दिवंगत अजितदादा पवार यांना खरी आदरांजली अर्पण करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *