![]()
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महापालिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती, सत्तास्थापनेचे प्रयत्न, घडत असलेला घोडेबाजार आणि पुढील भूमिका यावर सखोल चर्चा झाली. या बैठकीतून केडीएमसीत शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकावर बसण्याचा ठाम निर्णय समोर आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी निवडणुकांपैकी एक ठरली होती. भाजप महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सुरुवातीपासूनच येथील राजकीय गणित वेगळे होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही निवडणूक होती. निकालानंतर महायुतीला एकूण वर्चस्व मिळाले असले, तरी शिंदे गटाच्या शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले. मात्र स्पष्ट बहुमतासाठी त्यांनाही इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या निर्णयामुळे समीकरणे बदलली, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने संभ्रम वाढला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीतील नगरसेवकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आजच्या बैठकीत नगरसेवकांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याची तक्रार पक्षप्रमुखांकडे केली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या. पक्षाने संपूर्ण निवडणूक भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात लढवली असून, त्याच भूमिकेवर ठाम राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. नगरसेवकांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असून, जनतेने आम्हाला विरोधी भूमिका निभावण्यासाठीच निवडून दिले आहे. त्यामुळे कोणत्याही सत्तास्थापनेच्या मोहाला बळी न पडता विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय आम्हाला मान्य आहे. या बैठकीनंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकावर बसणार आहे. ही संपूर्ण निवडणूक आम्ही शिंदेसेना आणि भाजपविरोधात लढलो. आमचे नगरसेवक पाच ते सहा हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्याच पक्षांसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे सरदेसाई म्हणाले. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, चार नगरसेवक अद्याप नोंदणीसाठी पुढे न आल्याने पक्षात अस्वस्थता आहे. यावर बोलताना वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट इशारा दिला. मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असे सांगत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेवकांवरही नाराजी व्यक्त केली. हे नगरसेवक आमच्या चिन्हावर निवडून आले आहेत. आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ. तरीही ते आले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आमिषांपासून दूर राहण्याचा निर्धार एकूणच, कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेचे गणित जरी रंगत असले, तरी शिवसेना ठाकरे गटाने स्पष्टपणे विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली आहे. घोडेबाजार, दबावतंत्र आणि आमिषांपासून दूर राहण्याचा निर्धार पक्षाने केला असून, पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही स्पष्ट संकेत देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात केडीएमसीत सत्तेइतकीच विरोधी पक्षाची भूमिका देखील तितकीच आक्रमक दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कल्याण डोंबिवलीत सत्तेला नकार; ठाकरे गट विरोधी बाकावर बसणार:मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी दिल्या ठाम सूचना; नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाईचा इशारा
