[ads1]
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमरान शेख असे मृत तरुणाचे नाव असून तो मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी असल्याची माहिती
.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10.18 वाजता इमरान CSMT येथील आरपीएफच्या मुख्य पोस्टवर गेला होता. त्याला खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांबाबत माहिती घ्यायची होती. त्यावेळी त्याची वर्तणूक अस्वस्थ असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही व्यक्ती आपला जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्याने केल्याचेही सांगण्यात आले.
यानंतर परिस्थिती अचानक तणावपूर्ण झाली. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, इमरान आक्रमक झाला आणि त्याने आरपीएफच्या उपनिरीक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वतःलाही इजा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला स्वतःला किंवा इतरांना इजा होऊ नये, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शौचालयात गेल्यानंतर घडली धक्कादायक घटना
या घटनेनंतर दुपारी सुमारे 12.30 वाजता इमरानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. तो शौचालयात गेल्यानंतर काही मिनिटांनी आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जवळपास सात ते आठ मिनिटे प्रतिसाद न मिळाल्याने शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी इमरान आत बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला.
पोलिसांनी त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी 12.54 वाजता त्याला मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
मोबाईल किंवा ओळखपत्र सापडले नाही
इमरानची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे मोबाईल फोन किंवा कोणतेही ओळखपत्र आढळले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्याकडे रेल्वेची दोन जनरल तिकिटे सापडली. यापैकी एक तिकीट 18 सप्टेंबर 2026 रोजीच्या खंडवा-भुसावळ प्रवासाचे, तर दुसरे 19 सप्टेंबर 2026 रोजीच्या नाशिक-दादर प्रवासाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
या तिकिटांच्या आधारे इमरानने मुंबईत येण्यापूर्वी कोणता प्रवास केला, तो नेमका कुठे आणि कोणाच्या संपर्कात होता, तसेच मुंबईत येण्यामागील त्याचा उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे. त्याची ओळख आणि मागील हालचाली स्पष्ट करण्यासाठी त्याचा फोटो भुसावळ विभागातील रेल्वे प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे.
आता CID करणार तपास
रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, इमरानच्या शरीरावर कोणत्या स्वरूपाच्या दुखापती होत्या, पोलिसांनी केलेला बळाचा वापर कितपत आवश्यक होता आणि शौचालयात गेल्यानंतर नेमके काय घडले, या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असतील.
या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदनाचा अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, संबंधित पोलिसांचे जबाब आणि इमरानच्या प्रवासाची माहिती याआधारे संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
राज्यात आणखी एक परीक्षा रद्द:भंडाऱ्यात MPSC पूर्वतयारी प्रवेश परीक्षेदरम्यान वीज गेल्याने विद्यार्थ्यांचा संताप, गोंधळानंतर परीक्षा पुढे ढकलली; आता 24 सप्टेंबरला पुन्हा होणार परीक्षा

महाराष्ट्रात विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनावरून गोंधळाच्या घटना समोर येत असताना आता भंडारा जिल्ह्यात एमपीएससी पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतही मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू असतानाच मुसळधार पावसामुळे परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाला. त्यात पर्यायी वीजव्यवस्थाही उपलब्ध नसल्याने परीक्षार्थींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर विद्यार्थ्यांच्या संतापानंतर ही परीक्षा रद्द करून नव्या तारखेला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
[ads2]
















Leave a Reply