छत्रपती संभाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी!;इंडियन आर्मी संघाने पाडला गोलांचा पाऊस!
नांदेड :- येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी साईं एक्सेलेंसी छत्रपति संभाजीनगर, ए.जी. नागपुर, बीएसएफ जालंधर, इंडियन आर्मी जालंधर, मुंबई संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षणकांचे मन जिंकले. आजचा शेवटचा सामना मुंबईच्या दोन बलाढ्य संघादरम्यान खेळला गेला आणी तो बरोबरीवर सुटला. तर नांदेडच्या दोन्ही संघाच्या हाती निराशाच आली.
बुधवारी साखळी सामन्याचा तीसरा दिवस होता आणी सकाळी 9 वाजता साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध एनडीएसएफ इस्लामपुर दरम्यान पहिला सामना खेळला गेला. यात संभाजीनगर संघाने 3 विरुद्ध 1 गोल अंतराने सामना जिंकला. संभाजीनगरच्या भारत ने 21 व्या मिनिटाला, आकाशने 45 व्या मिनिटाला आणी धर्मेंदर पाल ने 58 व्या मिनिटाला मैदानी गोल केलेत. तर इस्लामपूर संघाच्या स्वप्नील पाटिल ने 34 व्या मिनिटाला पेनल्टी कार्नर मध्ये गोल केला.
आजचा दूसरा सामना ए. जी. नागपुर संघ विरुद्ध सुफियाना हॉकी क्लब अमरावती संघ यांच्यात खेळला गेला. नागपुर संघाने हा सामना 5 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकत एकतर्फा ठरवला. नागपुर संघातर्फे तिरासकुमार, सलीम सय्यद, रावनिस जायसवाल, गणेश पाटिल आणी प्रमोदने प्रत्येकी एक गोल केले. अमरावती संघाला एकही गोल करता आला नाही.
आजचा तीसरा सामना खालसा यूथ क्लब नांदेड विरुद्ध बीएसएफ जालंधर संघादरम्यान खेळला गेला. बीएसएफ जालंधर संघाने ख्यातीनुरूप खेळ करत नांदेड संघाचा 2 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. जालंधरतर्फे नवीन तिर्की आणी कमलजीतसिंघ यांनी गोल केले. नांदेड संघाने परिश्रम केले पण त्यांना गोल करण्यात अपयश लाभले.
आजचा चौथा सामना इंडियन आर्मी इलेवन जालंधर विरुद्ध चार साहबजादे हॉकी अकैडमी यांच्यात खेळला गेला. इंडियन आर्मी संघाने गोलांचा पाऊस पाडत आज नांदेड विरुद्धचा हा सामना 9 विरुद्ध 0 गोलच्या अंतराने सहज जिंकला. खेळाची लक्षणीय अशी बाब म्हणजे सर्वच गोल मैदानी स्वरुपात झाले. आर्मी संघातर्फे शिवा कुमार शिवांगीने दोन गोल केले. तर रमनदीपसिंघ, संकेत पाटिल, सोमा धन, प्रदीप सिंघ, आलीशान मोहम्मद, मनीष राजबहार आणि गुरजिंदरसिंघ यांनी प्रत्येकी एक – एक गोल केले. नांदेडच्या संघाला एकही गोल करता आले नाही.
आजचा पाचवा सामना कस्टम मुंबई विरुद्ध एमपीटी मुंबई संघात खेळला गेला. अती संघर्षपूर्ण अशा सामन्यात दोन्ही संघांनी तीन विरुद्ध तीन गोल करून सामना बरोबरीत रोखला. आजच्या विविध सामन्यात पंच म्हणून सिद्धार्थ गौर, गुरप्रीतसिंघ, राहूल राज, गुरमीतसिंघ, राजकुमार झा, रतिन्दर सिंघ बरार, अश्वीनकुमार, करनदीप सिंघ यांनी काम पहिले. तर तांत्रिक पंच व स्कोरर म्हणून गुरमीत सिंघ, रोहन प्रेमकुमार जावले, प्रिन्स सिंघ, विजयकुमार नागनूर यांनी काम पहिले. आयोजन समितीचे अध्यक्ष गुरमीतसिंघ नवाब आणी सदस्यांनी यांनी खेळाचे सुरेख नियोजन केले.