डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती; तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार


नांदेड (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी, भारतीय जनता पार्टी तृतीयपंथी आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून नियुक्ती झाल्याने सामाजिक, सांस्कृतिक व तृतीयपंथी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून तृतीयपंथी समाजाचे हक्क, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन, सामाजिक न्याय, सांस्कृतिक जतन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. जेठवाणी यांच्या कार्याची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

भारतीय शास्त्रीय नृत्य, लावणी व लोककला क्षेत्रातील संशोधक, कलाकार आणि समाजसेविका म्हणून त्यांनी देश-विदेशात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढविला आहे. विविध राष्ट्रीय परिषद, सांस्कृतिक महोत्सव, संशोधन प्रकल्प, जनजागृती अभियान, तृतीयपंथी सक्षमीकरण कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजहितासाठी सातत्याने योगदान दिले आहे.

या नियुक्तीनिमित्त प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. सान्वी जेठवाणी म्हणाल्या, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ एक पद नसून तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान, समान संधी आणि सर्वांगीण विकासासाठी अधिक वेगाने आणि प्रभावीपणे कार्य करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र शासनाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी सदैव पात्र ठरेन. शासनाच्या विविध योजना तृतीयपंथी समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य करत राहीन.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, दिव्यांग कल्याण मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्हाधिकारी महोदय, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार मानले.

डॉ. जेठवाणी यांनी शेवटी सांगितले की, माझ्यावर सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन. तृतीयपंथी समाजाला न्याय, सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष आणि सेवा यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *