![]()
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजपविरोधात दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. बार्शीतील ही महाआघाडी नैसर्गिक नसून केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी करण्यात आलेली तडजोड असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या वाढत्या ताकदीपुढे विरोधक घाबरले असून, त्यामुळेच अनेक पक्ष एकत्र येताना दिसत असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. जयकुमार गोरे यांनी भाजपच्या ताकदीवर भाष्य करताना सांगितले की, भाजप हा केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. आज अनेक राजकीय पक्षांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत युती आणि आघाड्या हा पर्याय निवडला जात आहे. स्वतःच्या बळावर निवडणूक लढवण्याची क्षमता नसल्यामुळेच विरोधक एकत्र येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप किती मजबूत आहे, हेच या घडामोडींमधून अधोरेखित होते, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला. बार्शी तालुक्यात शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपविरोधात एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयकुमार गोरे यांनी महायुतीतील घटक पक्षांनाही सूचक इशारा दिला. स्थानिक पातळीवर आघाड्या करताना काही आचारसंहिता पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महायुतीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले जात असतील, तर त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. बार्शीत ही युती नेमकी कशी झाली, कोणाच्या संमतीने झाली आणि याबाबत अधिकृत भूमिका काय आहे, हे संबंधित नेत्यांनाच विचारावे, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही अप्रत्यक्ष टोला लगावला. विरोधकांवर हल्लाबोल करताना जयकुमार गोरे यांनी ठाम दावा केला की, भाजपचा पराभव दोन-चार पक्षांनी एकत्र येऊन करणे शक्य नाही. भाजपविरोधात आज पाच-पाच पक्ष एकत्र येताना दिसत आहेत, यावरूनच विरोधकांची भीती स्पष्ट होते, असे ते म्हणाले. मात्र अशा अनैसर्गिक युती आणि आघाड्या जनतेला मान्य होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी मतदार भाजपच्या विकासाच्या आणि स्थैर्याच्या भूमिकेलाच पाठिंबा देतील, असे सांगत आगामी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल, असा ठाम दावा त्यांनी केला. दरम्यान, बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक ही नेहमीच दोन प्रमुख राजकीय केंद्रबिंदूंभोवती फिरताना दिसते. आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील ही लढत यंदाही केंद्रस्थानी असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी उभी राहिली असून, त्यांना शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा पाठिंबा आहे. या महाआघाडीची अधिकृत घोषणा दिलीप सोपल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली असून, आज सायंकाळी बार्शीत होणाऱ्या निर्धार मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपने बार्शीत विकासाचा मुद्दा, संघटनात्मक ताकद आणि केंद्र-राज्यातील सत्तेचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, विरोधकांची महाआघाडी किती काळ टिकेल आणि अंतर्गत मतभेदांमुळे ती कमकुवत होईल का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. बार्शीतील ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयाराम-गयाराम या शब्दप्रयोगावरून चिडले दरम्यान, महापौरपदाच्या पार्श्वभूमीवर आयाराम-गयाराम या शब्दप्रयोगावरून जयकुमार गोरे पत्रकारांवर चांगलेच चिडलेले दिसले. या शब्दाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत पत्रकारांना भाषेची मर्यादा आणि साधनसुचिता पाळण्याचा सल्ला दिला. भाजपचे सदस्यत्व स्वीकारून पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकांबाबत आदराने बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रश्न विचारताना लोकांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनाही उद्देशून बोलताना, एका वर्तमानपत्रातून दुसऱ्या वर्तमानपत्रात जाणे हीही एक प्रक्रिया असते, त्यामुळे प्रश्न विचारताना संयम आणि जबाबदारी ठेवावी, असे स्पष्ट मत जयकुमार गोरे यांनी मांडले.
ठाकरे गट, शिंदे गटासह दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र:बार्शीतील महाआघाडीवर भाजप आक्रमक; ZP रणसंग्राम तापला
