नागरिकांनी भरले नेत्रदान आणि अवयव दानाचे संकल्पपत्र:गणेश जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनने राबवला अनोखा उपक्रम‎




महापालिका कार्यालयाशेजारी असलेल्या पावन गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. इच्छुक भाविकांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सामाजिक कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नेत्रदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरून आपली सामाजिक बांधिलकी जपली. नेत्रदान व अवयवदान ही केवळ दानाची कृती नसून ती एखाद्या व्यक्तीस नवे जीवन देणारी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते तर अवयवदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. ही जाणीव भाविकांमध्ये निर्माण करण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशन पुढाकार घेत असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. फाउंडेशनने नेत्रदान व अवयवदान चळवळीत सातत्याने योगदान दिले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली आहे. धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने सुरू असल्याचेही बोरुडे यांनी सांगितले. या उपक्रमास जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतीश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *