एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून:नाशिकमधील इंदिरानगरातील उद्यान परिसरातील घटना




इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास तरुणीच्या खुनाची घटना उघडकीस अाली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला अाहे. खून केल्यानंतर हल्लेखोर प्रियकर फरार झाला असून, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून त्याचा शाेध सुरू आहे. वैष्णवी अावारे (२०) असे या तरुणीचे नाव अाहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तरुणीचा खून झाल्याची माहिती मिळाली. पथक तत्काळ घटनास्थ‌ळी दाखल झाले. या ठिकाणी रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता चाकू गळ्यात भोकसून खून केल्याचे निदर्शनास अाले. घटनास्थळी चाकू मिळून अाला अाहे. या ठिकाणी इंदिरानगर पाेलिस पथक तसेच गुन्हे शाखा अाणि फाॅरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले हाेते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात अाला अाहे. इनसाइड स्टोरी: पेईंगगेस्ट म्हणून वास्तव्य तरुणी मूळची अंमळनेरची असून, येथे शिक्षणाकरिता कानडे रोहाऊसमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेली असता संशयित तरुण अाला. तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. निघून जाताना संशयिताने खिशातून चाकू काढून तरुणीच्या गळ्यावर वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. संशयित फरार झाला अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *