पुण्यात महायुतीत ‘बिघाडी’ची ठिणगी?: भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, अजित पवारांसोबत चर्चा; शिंदेंचा 25 जागांसाठी फॉर्म भरण्याचा आदेश – Pune News

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असतानाच, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद आता विकोपाला गेला आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 35 ते 40 जागांचा प

.

पुण्यात भाजप आणि शिवसेना युतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपने शिवसेनेसमोर 15 अधिक 1 अशा 16 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, शिवसेना किमान 25 जागांवर ठाम आहे. वारंवार विनंती करूनही भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना नेत्यांनी थेट अजित पवारांची भेट घेतल्याचे समजते. “जर भाजप सन्मान देणार नसेल, तर आम्ही राष्ट्रवादीसोबत जाऊ,” असा स्पष्ट इशाराच शिंदे गटाने या कृतीतून दिला आहे.

एकनाथ शिंदेंचा “उद्याच 25 अर्ज भरण्याचा आदेश

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक आहे. युतीची अधिकृत घोषणा रखडलेली असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आपल्या 25 इच्छुक उमेदवारांना उद्याच (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ऐनवेळी भाजपने धोका दिल्यास पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी ही ‘बॅकअप’ प्लॅनिंग असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच, आता शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांना दिलेली साद पुण्याच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत भाजप नमती भूमिका घेणार की पुण्यात महायुतीचे तीन शकले होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks