‘…येथे भिकारी भाड्याने मिळतात’:संभाजीनगर शहरातील क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, कॅनॉट प्लेस परिसरात भिकाऱ्यांचे नेटवर्क

0
orig_new-project-2026-01-24t072155982_1769219419.jpg




शहरातील सिग्नलवर दिसणारे ते केविलवाणे चेहरे, कडेवरचे रडणारे बाळ आणि मदतीसाठी पसरलेले हात… हे केवळ गरिबीचे दर्शन नसून त्यामागे एक भयानक व्यापार आणि संघटित नेटवर्क असल्याचे समोर आले आहे. शहरात चक्क अडीच हजार रुपयांच्या ‘डेली रेंट’वर १ महिला आणि २ चिमुकली मुले भीक मागण्यासाठी भाड्याने मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांती चौक, रेल्वे स्टेशन परिसर आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॅनॉट प्लेसमध्ये हे रॅकेट फोफावले आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने बनावट ग्राहक (प्लॉटिंग व्यावसायिक) बनून या टोळीशी संपर्क साधला. “आमच्या नवीन प्लॉटिंगच्या साइटवर येणाऱ्या ग्राहकांना दानशूरपणा दाखवण्यासाठी भीक देतात. त्यासाठी भिकारी हवे आहेत,’ असे सांगताच या नेटवर्कच्या दलालांनी त्यांचे दरपत्रकच समोर ठेवले. २४ तास पोलिसांचा पहारा असलेल्या क्रांती चौकासारख्या संवेदनशील ठिकाणी हे नेटवर्क बिनदिक्कतपणे चालत असल्याचे उघड झाले आहे. भिक्षुकी प्रतिबंधक कायदा १९५९ नुसार बेकायदेशीर आहेच, शिवाय मुलांचा वापर केल्यामुळे बाल न्याय कायदा २०१५ (कलम ७६) अंतर्गत ५ वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची तरतूद आहे. भाड्याने मुले देणे हा भारतीय न्याय संहिता (मानवी तस्करी) अंतर्गत गंभीर गुन्हा असून, यात जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. ९० सेकंदांहून अधिक वेळ चालणाऱ्या सिग्नलची निवड शहरातील सिडको भागातील वसंतराव नाईक चौक, सेव्हन हिल्स, क्रांती चौक ही प्रमुख तीन ठिकाणे भिकाऱ्यांच्या टार्गेटवर आहेत. या ठिकाणचे सिग्नल हे ९० सेकंदांहून अधिक काळ असते, त्यामुळे वाहनधारकांशी अधिक बोलून त्यांना भावनिक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जाऊ शकतात. त्यानंतर जेथे नागरिक अधिक काळ थांबतील असे भाग बघितले जातात, यात प्रामुख्याने कॅनॉट प्लेस, निराला बाजार, दोन्ही बसस्थानके यांची निवड केलेली आहे. या ठिकाणी एक व्यक्ती एक तासाहून अधिक काळ उभी असेल तर एकच भिकारी त्यांच्याकडे तीन वेळेस येतो, असे ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीच्या पाहणीत समोर आले आहे. हा प्रकार शहरभर सर्रास सुरू असल्याचे दिसून येते. कंत्राटदाराकडे पैसे पोहोचतात परस्पर दिवसभर जमा केलेले पैसे हे चिल्लर व फार तर १० किंवा २० रुपयांच्या नोटा असतात. या नोटा घेऊन परिसरातील काही ठरविक व्यापाऱ्यांकडे जातात. तेथे सुट्ट्या पैशांच्या बदल्यात चलनी नोट घेतली जाते. त्यातही भिकाऱ्यांमध्ये असलेला पुरुष एखादी नोट स्वतःच्या खिशात घालतो. ५०० किंवा १०० रुपयांच्या स्वरूपात केलेल्या या नोटा कंत्राटदाराला दिल्या जातात. त्यासाठी रस्त्याच्या कडेला याच भिकाऱ्यांच्या राज्यातील काही मंडळी खेळणी विकत असतात, त्यांच्या माध्यमातून या पैशांची देवाणघेवाण होते. पुरुष मोबाइल-पाकीटमारीच्या टोळ्यात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतून प्रमुखरीत्या हे भिकारी आलेले आहेत. यातील महिला वर्ग भीक मागतो, तर त्यांची पुरुष मंडळी मोबाइल चोरी, पाकीटमार यांच्या टोळ्यात सक्रियपणे काम करतात. त्या ठिकाणी चोरलेले पाकीट इतरत्र देण्यासाठी या महिलांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
केस १ : @ क्रांती चौक प्रतिनिधी : आमची प्लॉटिंग साइट आहे. तिथं येणाऱ्या लोकांना ‘शगुन’च्या नावाखाली भीक द्यायची असते.
भिकारी महिला : मग आम्ही येऊ.
प्रतिनिधी : लहान मुलगा सोबत पाहिजे.
भिकारी महिला : ठीक आहे. मी व २ लहान मुलं असतील. अडीच हजार रुपये लागतील.
प्रतिनिधी : एवढे पैसे? भीक मिळेल ती कुणाची?
भिकारी महिला : भीक जमा तरी किती होणार? ती जास्त झाली तर अर्धी करू. नाही तर तुम्ही ठेवा. आमचा मर्द ते ठरवेल.
प्रतिनिधी : खूप जास्त भाव सांगताय. मालकाला विचारून सांगतो.
केस २ : @ रेल्वे स्टेशन
प्रतिनिधी : क्रांती चौकातीलच प्रश्न.
भिकारी पुरुष : ठीक आहे.. पैसे लागतील आणि तिकडं जाण्याआधी अॅडव्हान्स लागेल.
प्रतिनिधी : कसे पैसे? उद्या तिथं गेल्यावर पैसे देईल. किती घेणार?
भिकारी पुरुष : प्रत्येक माणसाचे ५०० रुपयेप्रमाणे लागतील. तुम्हाला किती लोक पाहिजे?
प्रतिनिधी : जास्त होत आहे. आम्हाला १ लहान मुलगा व महिला हवी आहे.
भिकारी पुरुष : चालेल, मिळून जाईल. आता पैसे देऊन टाका आणि उद्या घ्यायला गाडी पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed