![]()
खड्ड्यात बसविलेला पीव्हीसी पाईप, तळाशी अंथरलेले नारळाच्या शेंड्यांचे थर आणि त्यातून तयार झालेली वॉटर बँक, या अभिनव तंत्रामुळे कमी पाण्यातही १२ ते १४ फूट उंचीचे प्रौढ वटवृक्ष यशस्वीपणे जगविण्याचा प्रयोग अहिल्यानगरातील “कर्म फाउंडेशन’ने करून दाखविला आहे. “झाडे लावा, झाडे जगवा’सह “झाडे लावा, पृथ्वी वाचवा’ हा संदेशही या संस्थेने दिला. दिव्य मराठीच्या एक वृक्ष, एक जीवन उपक्रमांतर्गत या संस्थेने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत ५४९ वटवृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले. या उपक्रमाचा भाग म्हणून, नुकतेच बारदरी येथे आणखी २१ प्रौढ वटवृक्षांची लागवड करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी एका रस्त्याच्या कडेला, मोठी वटवृक्ष विकासाच्या नावाखाली कापले जात असल्याचे कांगणे यांनी पाहिले. त्यावेळी विरोध करूनही झाडे वाचवता आली नाही. त्यामुळे १००० वटवृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. या मोहिमेचा उद्देश केवळ झाडे लावणे नसून ती पूर्णपणे स्वयंभू होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे हा आहे. मित्र, पर्यावरणप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सहकार्याने ही चळवळ उभी राहिली. एक वृक्ष, एक जीवन उपक्रमांतर्गत संस्थेने चांदबीबी महाल परिसरात सह्याद्री वडराई उभारण्याचा संकल्प केला. त्याअंतर्गत आतापर्यंत ६८ प्रौढ वडाची झाडे लावण्यात आली होती. या उपक्रमाचा विस्तार करत रविवारी बारदरी गावातील स्वामी विवेकानंद जलाशयालगत आणखी २१ प्रौढ वटवृक्षांची लागवड करण्यात आली. संस्थेच्या अनुभवावरून ही झाडे वर्षभरात स्वयंभू होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अमित लोढा यांनी वटवृक्ष दान केले. शहर व अहिल्यानगर तालुक्यातील नर्सरीतून ही रोपे आणण्यात आली. दिव्य मराठी, बारदरीतील ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी युवक आणि कर्म फाउंडेशनच्या सदस्यांच्या सहभागातून हा उपक्रम पार पडला. यावेळी असे केले जाते संगोपन वटवृक्षांची लागवड करताना खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या शेंड्यांचा थर अंथरला जातो. त्यामध्ये दीड फूट लांबीचा पीव्हीसी पाईप बसवून त्यानंतर झाडाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात या पाईपमधून पाणी दिले असता ते थेट मुळांपर्यंत पोहोचते. नारळाच्या शेंड्यांमध्ये पाणी साठून राहिल्याने ते हळूहळू मुरते आणि झाडाला दीर्घकाळ ओलावा मिळतो. { २०२२ : कर्म फाउंडेशनची स्थापना { आजपर्यंत : ५४९ वटवृक्षांची लागवड व संवर्धन दिव्य मराठीच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम { प्रमुख ठिकाणे : चांदबीबी महाल, मांडवा, रुईछत्तीशी, भातोडी पारगाव, नेवासे, शहर परिसर, राहुरी, संगमनेर { पुढील उद्दिष्ट : १००० स्वयंभू वटवृक्ष उभे करणे एक झाड २७४ लिटर ऑक्सिजन निर्मिती करतो एक वडाचे झाडे वर्षभरात वातावरणातील सुमारे ५४० किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. तर एक वडाचे झाड दररोज सुमारे २७४ लिटर ऑक्सिजन निर्माण करते, रात्रीच्या वेळी श्वसनादरम्यान “कार्बन डाय ऑक्साइड’ सोडतात, परंतु प्रकाशसंश्लेषणादरम्य ान त्यांचे एकूण सीओटू शोषण रात्रीच्या वेळी सीओटू सोडण्यापेक्षा जास्त असते, ज्यामुळे ते निव्वळ ऑक्सिजन उत्पादक बनतात आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरतात, अशी माहिती वनस्पती शास्त्र विभागातील तज्ज्ञाने दिली.
पर्यावरण संरक्षण:पीव्हीसी पाईपच्या "वॉटर बँक'ने कमी पाण्यात वटवृक्षांना जीवदान, एक वृक्ष, एक जीवन अंतर्गत 1000 वटवृक्ष लागवड मोहिम
