वडिलांना तिकीट नाकरल्याने संतापजनक निषेध!:आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर केली लघुशंका, तरुणाचे निंदनीय कृत्य




महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर, आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, लातूरमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला वाद एका टोकाच्या आणि संतापजनक स्तरावर पोहोचला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या लातूर शहरातील जनसंपर्क कार्यालयाबाहेर एका तरुणाने लघवी करून आपला निषेध नोंदवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी २१ जानेवारी २०२६ रोजी घडली. उदगीर तालुक्यातील निळेबन जिल्हा परिषद गटातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मधुकर एकुरकेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्याने एकुरकेकर कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. ‘अन्याया’चा आरोप करत विचित्र मार्ग आपल्या वडिलांवर अन्याय झाल्याच्या भावनेतून मधुकर एकुरकेकर यांचा मुलगा नितीन एकुरकेकर याने संतापाच्या भरात हे कृत्य केले. त्याने थेट लातूर येथील आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन लघवी केली आणि आपला निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, या कृत्याचा व्हिडिओ त्याने स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. मात्र, प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याचे लक्षात येताच काही वेळाने तो व्हिडिओ हटवण्यात आला. कार्यकर्त्यांची खदखद आणि समर्थकांचा दावा मधुकर एकुरकेकर यांच्या समर्थकांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. “एकुरकेकर यांनी अनेक वर्षे स्थानिक पातळीवर प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. पक्ष अडचणीत असतानाही ते सोबत राहिले. मात्र, निवडणुकीच्या वेळी निष्ठेची दखल न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,” असा दावा समर्थकांनी केला आहे. याच अन्यायाच्या भावनेतून नितीनने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया लोकशाहीत निषेध नोंदवण्याचे अनेक मार्ग असताना, अशा प्रकारचे निंदनीय कृत्य करणे चुकीचे असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आमदारांच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे लातूरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आता पक्ष यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *