![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदार यादीतील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. एसआयआर (Special Summary Revision) प्रक्रियेत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. एसआयआरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे बडनेऱ्यात विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. एडतकर बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे एसआयआर समन्वयक किशोर बोरकर आणि युवक काँग्रेसचे पुढारी समीर जंवजाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ॲड. एडतकर यांनी सांगितले की, मतदार याद्या अद्ययावत असणे हा निवडणुकीचा पाया आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन प्रत्येक पात्र मतदारांपर्यंत पोहोचावे. तसेच, मतदार यादीतील नावांची तपासणी, नवीन मतदार नोंदणी आणि विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत सतत जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. एसआयआर समन्वयक किशोर बोरकर यांनी एसआयआर प्रक्रिया, मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि नाव वगळणे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक ठिकाणी संभ्रम पसरवला जात असून, मतदार यादीतील काही नावे वगळली जातील असे सांगितले जात आहे, मात्र आपण जागृत राहिल्यास तसे काही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बोरकर पुढे म्हणाले की, केवळ दुबार, तिबार आणि मृत झालेल्यांची नावे हटवण्यात येणार आहेत. याशिवाय, बोगस मतदारही हटवायचे आहेत. त्यासाठी बीएलओ-२ यांनी याद्या तपासून नावे अद्ययावत करावीत. त्यामुळे प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्यानंतर समीर जंवजाळ, वैभव देशमुख, भैय्या निचळ आणि माजी महापौर अशोक डोंगरे यांनीही एसआयआरच्या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. याप्रसंगी भातुकली तालुकाध्यक्ष नरेशसिंह ठाकूर, डॉ. रमेश बोरा, डॉ. बी.आर. देशमुख, राजाभाऊ चौधरी, प्रा. अनिल देशमुख, बडनेरा विधानसभा युवक काँग्रेसचे आशिष यादव, ॲड. शितल गजभिये, कुणाल गावंडे, ओम कुबडे, प्रियाल मोहोड, अविनाश मेश्राम, सुनील रामटेके, धीरज देशमुख, मयुर देशमुख, ॲड. स्मिता मोरे, राहुल गजभिये, सारिका गवई, सुनिता रारबोले, ओजस्वीनी गजभिये, खुशी गजभिये आणि लता गजभिये यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदार यादी बदलावर लक्ष द्या – ॲड. एडतकर:काँग्रेसचे बडनेऱ्यात एसआयआरसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर
