![]()
अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, वेतन मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही पंचायत समिती स्तरावरून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा वेतन निधी शासनाने जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना वितरित केला आहे. मात्र, पंचायत समिती स्तरावरून कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या विलंबामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. काही ग्रामपंचायतींनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले वार्षिक अहवाल वेळेत सादर केलेले नाहीत. दुसरीकडे, पंचायत समिती कार्यालयातील संबंधित कर्मचारी बीएलओ (मतदान केंद्र अधिकारी) आणि एसआयआर (सूक्ष्म पुनरिक्षण) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार बिल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये. यामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला असून, त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव निळकंठ ढोके यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले:निधी असूनही खात्यात जमा नाही; संघटनेचा आंदोलनाचा इशारा
