[ads1]
![]()
वसमत शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या जागेमध्ये एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी ता 18 दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. मृतदेहाच्या शरीरावर जखमा असल्यामुळे हा खूनाचा प्रकार असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या जवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, सय्यद इमरान यांच्यासह पोलिसांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची तसेच मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या चेहऱ्यावर तसेच शरीरावर दगडाने मारल्याच्या जखमा आहेत. पोलिसांनी आता मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्यासाठी वसमत शहरासह तालुक्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच नेमका प्रकार स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तूर्तास घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता तसेच मृतदेहावरील जखमा लक्षात घेता सदर तरुणाचा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तरुणाला इतरत्र मारहाण करून त्याचा मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याशिवाय 24 तासापूर्वी तरुणाचा मृत्यू झाला असावा असे पोलिसांनी सांगितले. सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर नेमकं खून कसा झाला हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसानी सांगितले. दरम्यान मागील पंधरा दिवसात वसमत शहरातील खूनाची ही दुसरी घटना आहे.
[ads2]
वसमत शहरात 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला:पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू
















Leave a Reply