![]()
टायर फुटताच आगीने असे रौद्र रुप धारण केले होते.
तिवसा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एका मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. टायर फुटल्याने ही घटना घडली असून, प्लास्टिकचे दाणे भरलेला ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेमुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली
.
नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जाणारा हा ट्रक दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळून जात असताना त्याच्या मागील चाकाचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि टायरजवळ असलेले लायनर घासल्याने ट्रकला खालून आग लागली. ट्रकमध्ये प्लास्टिकचे दाणे असल्याने आगीने त्वरित रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणातच संपूर्ण ट्रक जळून कोळसा झाला.
आगीची घटना निदर्शनास येताच दोन्ही बाजूंनी येणारी वाहने थांबवण्यात आली. घटनेची माहिती तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
