![]()
टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात शूटर अब्दुल रऊफ मर्चंट याचा आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मर्चंटची प्र
.
30 डिसेंबर रोजी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रऊफ मर्चंटला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने 4 जानेवारीला त्याला पुन्हा कारागृहात हलवण्यात आले. त्यानंतर आज गुरुवारी (दिनांक 8 जानेवारी) सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मर्चंटच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून, त्याच्यावर योग्य उपचार न झाल्यामुळेच हा मृत्यू ओढवल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
गुलशन कुमार यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या होत्या
ऑगस्ट 1997 मध्ये टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची मुंबईत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ते मंदिरातून परतत असताना कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा शूटर अब्दुल रऊफ मर्चंट याने त्यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या होत्या. केवळ हत्या करणे हाच उद्देश नसून अंडरवर्ल्डची दहशत पसरवण्यासाठी त्याने हे क्रूर कृत्य केले होते. असे म्हटले जाते की, गोळीबार केल्यानंतर मर्चंटने अबू सालेमला फोन केला आणि सुमारे दहा मिनिटे मृत्युशी झुंज देणाऱ्या गुलशन कुमार यांच्या वेदनादायी किंकाळ्या त्याला ऐकवल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.
उपचार सुरू असतानाच मृत्यू
याच हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अब्दुल रऊफ मर्चंट याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात तो आपली शिक्षा भोगत होता. गुरुवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या मर्चंटच्या निधनामुळे गुलशन कुमार हत्याकांडातील एका मुख्य गुन्हेगाराचा अंत झाला आहे.
खंडणी देण्यास नकार दिल्याने केली होती हत्या
एकेकाळी ज्यूसचे दुकान चालवणारे गुलशन कुमार आपल्या कष्टाने ‘कॅसेट किंग’ बनले, मात्र त्यांच्या या यशासोबतच शत्रूंची संख्याही वाढत गेली. लेखक एस. हुसैन जैदी यांच्या ‘माय नेम इज अबू सालेम’ या पुस्तकातील उल्लेखानुसार, कुख्यात गँगस्टर अबू सालेमने त्यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. परंतु गुलशन कुमार यांनी ती देण्यास स्पष्ट नकार देत, ‘इतक्या पैशात मी वैष्णो देवी मंदिरात भंडारा आयोजित करेन’ असे धाडसाने सुनावले होते. याच रागातून 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर 16 गोळ्या झाडून गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
