बनावट पोलिसांकडून दीड लाखांच्या सोन्याच्या अंगठ्यांची फसवणूक


नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट पोलिसांची बतावणी करून एका नागरिकाची सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास नागार्जुना शाळेसमोरील रस्त्यावर फिर्यादी नंदकिशोर काशीराम पाटील (वय ५८, रा. गोपालनगर, नागापूर, ता. मुखेड, जि. नांदेड) यांना तीन अनोळखी इसमांनी गाठले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून फिर्यादीला विश्वासात घेतले.
त्यानंतर फिर्यादीच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आणि त्या कागदात गुंडाळून परत दिल्याचे भासविले. मात्र, त्यामध्ये खऱ्या अंगठ्यांऐवजी बनावट अंगठीची पुडी देऊन आरोपींनी सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१९(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गायकवाड करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून पोलीस असल्याची बतावणी केल्यास तत्काळ ओळखपत्राची खात्री करून घ्यावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Post Views: 12






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *