![]()
राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनेक वर्षांच्या चर्चेनंतर घेण्यात आला असून, अजित पवारांनी केलेले भाष्य केवळ पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध
.
आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, ही भूमिका अनेक वर्षांपासून पक्षात चर्चेत होती. दरवेळी त्यातून माघार घेतली जात होती, पण शेवटी आम्ही हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे होणारी टीका आम्ही सहन केली आणि आजही करत आहोत. काळाच्या उदरात काय दडलेले आहे ते आपोआप नंतर बाहेर येईल, असे तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. वंजारी मंगल कार्यालयात मेळावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे किंवा नाही, हे सांगण्याइतपत मी मोठा नेता नाही. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. मात्र, आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यावर आम्ही कायम आहोत, असे तटकरे यांनी नमूद केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवत आहोत. गेली अनेक वर्षे एकत्र काम केल्याने कार्यकर्ते आनंदी असणे स्वाभाविक आहे. मात्र, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे फक्त पिंपरी चिंचवडपुरतेच होते. त्यांनी अन्यत्र कोठे असे विधान केल्याचे ऐकिवात नाही, त्यामुळे त्याचे अर्थ सार्वत्रिक नाहीत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
विलिनीकरणाच्या अनुषंगाने आतापर्यंत माझ्याशी प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा झाली नाही. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने ते ही भूमिका मांडू शकतात. सध्या तरी हा विषय पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरताच मर्यादित असल्याची स्पष्टोक्ती तटकरे यांनी दिली.
शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जातील, हे संजय शिरसाट यांचे वक्तव्य ते कोणत्या अधिकारात करतात हे आपणास माहीत आहे. एरवी ते भूमिका मांडताना योग्य असतात, पण कधी कधी ते घसरतात. त्यांचे हे वक्तव्य याच पातळीवरचे आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
