![]()
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कारभारावर टीका केली. मात्र, या टीकेवरून आता काँग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण या
.
सोमवारी नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. “गेल्या ७० वर्षांत राज्यकर्त्यांना शहरांच्या विकासाचा विसर पडला होता. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना आणि अमृत योजनेच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी शहरांना दिला,” असे फडणवीस म्हणाले होते. आता या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर देत थेट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.
नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का की तीही देवेंद्र फडणवीस चरणी गहाण ठेवलीय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज ७० वर्षात कॉंग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले. यावेळी तिथेच बसलेल्या अशोकरावांना हा स्वतःचा अपमान वाटला नाही का? स्वतःचा जाऊद्या पण आपल्या वडिलांबद्दल कोणी बोललं तर कोणताही मुलगा हे कसं ऐकून घेईल? अशोकरावांना हा स्व. शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान वाटला नाही का? की आपण एवढी लाचारी पत्करलीय की वडीलांचा अपमानही तुम्हाला क्षुल्लक वाटतोय, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
आम्हाला शंकररावांच्या कामाचा गर्व
अशोक चव्हाण आज भाजपमध्ये असले तरी स्व. शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचेच नेते होते, याची आठवण सपकाळ यांनी करून दिली. “आम्ही आजही गर्वाने सांगू शकतो की, स्व. शंकरराव चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आणि जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली,” असे सपकाळ म्हणालेत.
