29 शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा दीड महिन्यांपासून खंडित:कळमजापूरजवळ ट्रान्सफॉर्मर जळाल्याने महावितरणवर संताप, तातडीने डीपी बदलण्याची मागणी




चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शेतशिवारात पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तब्बल दीड महिन्यांपासून २९ शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे वीज पंप सुरू करता येत नाहीत. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती असून, वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डीपीवर शेतीच्या वीज जोडण्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने तो वारंवार ओव्हरलोड होतो. याच कारणामुळे ट्रान्सफॉर्मर जळाला. या संदर्भात महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ उलटूनही नवीन ट्रान्सफॉर्मर किंवा पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. महावितरणने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कळमजापूर येथील पळसखेड पांधन डीपीवरील जळालेला ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भविष्यात ओव्हरलोडची समस्या टाळण्यासाठी स्वतंत्र डीपीची व्यवस्था करावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *