महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) उन्हाळी सत्र २०२६ (टप्पा-२) अंतर्गत अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेल्या लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप सिताराम कडू यांनी परिपत्रक क्रमांक ६७/२०२६
.
विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा उन्हाळी-२६ टप्पा-२ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यंत जिकिरीचे झाले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता विद्यापीठाने ६ जुलै ते ९ जुलै २०२६ या कालावधीतील सर्व परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
असे असेल परीक्षांचे ‘सुधारित वेळापत्रक’
रद्द झालेल्या परीक्षा आता खालील सुधारित तारखांनुसार ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील:
| अ.क्र. | पूर्वीचा परीक्षा दिनांक | परीक्षेचा सुधारित दिनांक (नवे वेळापत्रक) |
| १ | ०६/०७/२०२६ | २३/०७/२०२६ (गुरुवार) |
| २ | ०७/०७/२०२६ | २४/०७/२०२६ (शुक्रवार) |
| ३ | ०८/०७/२०२६ | २७/०७/२०२६ (सोमवार) |
| ४ | ०९/०७/२०२६ | २९/०७/२०२६ (बुधवार) |

१० जुलैपासूनच्या परीक्षांमध्ये कोणताही बदल नाही
विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, केवळ ६ ते ९ जुलै दरम्यानच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. १०/०७/२०२६ रोजीच्या आणि त्यापुढील सर्व लेखी परीक्षा पूर्वी प्रसिद्ध केलेल्या मूळ वेळापत्रकानुसारच नियमितपणे घेतल्या जातील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, याची सर्व संबंधित महाविद्यालये, केंद्रप्रमुख आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सूचनाफलकावर प्रसिद्धी
हे सुधारित वेळापत्रक संबंधित सर्व संलग्न महाविद्यालयांतील अधिष्ठाता आणि प्राचार्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच महाविद्यालयाच्या अधिकृत ऑनलाइन संकेतस्थळावर आणि ऑफलाइन सूचनाफलकावर (Notice Board) ठळकपणे प्रसिद्ध करावे, असे आदेश परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिले आहेत. अधिक तपशीलासाठी विद्यार्थी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
