जिल्हा परिषद निवडणूक:शिवसेना-भाजप युतीची शक्यता अत्यंत कमी; 950 जणांनी भाजपकडे मागितली उमेदवारी




जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हे कमी आहेत. भाजपच्या उमेदवारीसाठी जालना रस्त्यावर धूत हॉस्पिटल ते विमानतळ अशा दुतर्फा चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जि.प. ६३, पं. स.च्या १२६ जागांसाठी ९५० इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब आणि आमदार अनुराधा चव्हाण हे उमेदवारांच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. पैठण येथील शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. युतीसंदर्भात बैठकांचे सत्र युतीसंदर्भात शिवसेना, भाजपची बैठक सोमवारी झाली. त्यात वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याची शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. महानगर पालिका निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेनेला फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत युती आणि जागावाटपासंदर्भात शिवसेना बॅकफूटवर राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात ६३ गटांसाठी १३२६ अर्ज विक्री प्रशासकीय स्तरावर उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकूण १३२६ अर्जांची विक्री करण्यात आली. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. सोमवारपर्यंत ३४ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २२ उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या गणांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. दोन दिवसांत अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. ॲनालिसिस – भाजपची ‘वेट अँड वॉच’ रणनीती मनपा निवडणुकीप्रमाणेच शेवटच्या क्षणापर्यंत युतीची चर्चा करायची आणि जागावाटप मनासारखे झाले नाही तर ऐनवेळी स्वबळाचा नारा द्यायचा, अशी भाजपची खेळी असू शकते. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार नाहीत, तेथे इतर पक्षांतील ताकदवान नेत्यांना उमेदवारी देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. यामुळे पक्षाची ताकद ग्रामीण भागात वेगाने वाढवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *