![]()
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) आणि रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून गेटपाससाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. या संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांना निवेदन सादर केले. पंचवटी चौकातील या रुग्णालयात गेटपासच्या नावाखाली रुग्णाच्या नातेवाईकांकडून ४० ते ५० रुपये घेतले जात आहेत. ही आकारणी गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी आर्थिक लूट असून ती अवाजवी असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे म्हणणे आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी वसू महाराज आणि बंटी रामटेके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांची भेट घेतली. डॉ. देशमुख यांनी ही आकारणी अवाजवी असल्याची बाब मान्य केली असून, त्यात लवकरच सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले. रुग्णालयात उपचारांसाठी येणारे अनेक रुग्ण गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या नातेवाईकांकडून गेटपाससाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जाऊ नयेत, अशी विनंती प्रहारच्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी वसू महाराज आणि बंटी रामटेके यांच्यासह प्रहारचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पीडीएमसीत गेटपाससाठी अवाजवी शुल्क आकारणी:प्रहार जनशक्ती पक्षाने अधिष्ठात्यांना निवेदन दिले, सुधारणेची ग्वाही
