.

येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून वेळेचे आणि नियमाचे बंधन स्वतःचा मनाने राबविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे तथाड उघड्या कार्यालयात कोणालाही सहजरित्या प्रवेश मिळून गोपनीय दस्तऐवजाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तब्बल ५३ गावांचा तालुका असलेल्या वाशी तालुक्यासाठी मुख्य शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी नगर भागात दुय्यम निबंधक कार्यालय स्थापण्याय आलेले आहे. कार्यालयाचा कारभार हा अतिशय संवेदनशील प्रक्रियेत मोडतो.यामुळे या कार्यालयातील नोंदणी होणारा प्रत्येक दस्तऐवज अत्यंत महत्वाचा असतो. मात्र येथील कार्यालयातील अधिकारी या बाबत बेफिकीर असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. बुधवारी(दि.२५) सकाळी ११ वाजून १० मिनिटे झालेली असताना या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक अधिकारी आरती नागरगोजे अथवा संगणक परिचालक कोणीच कार्यालयात अथवा शहरात उपस्थित नव्हते.अधिकाऱ्याच्या वरदहस्ताने आपली दलाली चालवणाऱ्या कोण्या एका दलालानेच उघडून ठेवले होते. त्याच बरोबर नोंदणी झालेल्या दस्ताची खोली देखील उघडीच होती. यामुळे दस्ताची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. या बाबत अधिकारी गंभीर नसल्याचे दिसून आले. कार्यालयात अधिकारीच उपस्थित नसल्याने दलालांना मोकळा प्रवेश होऊन शासकीय कार्यालय कमी आणि दलाल आणि बाहेरच्या व्यक्तींचा अड्डा बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक गावातून दस्त नोंदणीसाठी सकाळी लवकर येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊन दलालांमुळे आर्थिक लूट होत आहे.
बेफिकिरी कोणाच्या आशीर्वादाने, कामकाजात उपाययोजनांची गरज : अशा प्रकारे अनधिकृत व्यक्तीच्या हाताने संवेदनशील कार्यालयाचा कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची गरज आहे. तसेच कार्यालयात सीसीटीव्ही व बायोमेट्रिक यंत्रणा, दलालांना बंदी होणे गरजेचे आहे. या गोष्टी न केल्यास याला वरिष्ठ स्तरावरून कोणाच्या जीवावर बेफिकिरी होत आहे, हे सिद्ध होईल.
तब्येत बरी नसल्याने काल रजेवर होते, उशीर झाला माझी तब्येत काल बरोबर नसल्याने सुटीवर होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी येण्यास उशीर झाला. शिपाई इतर जागा रिक्त असल्याने अडचण आहे. -आरती नागरगोजे, दुय्यम निबंधक, वाशी
