![]()
अमरावती येथे एका अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचे नाव शैलेश महेंद्र लोणारे (वय ३०, रा. हिवरा बुजुर्ग, ता. अमरावती) असे आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, शैलेशने ३ नोव्हेंबर २०२० रोजी हे गैरकृत्य केले होते. त्याने ‘तुझे घर मला सापडत नाही, त्यासाठी मदत कर’ असा बहाणा करून अल्पवयीन मुलाला बडनेरा येथील राजेश्वरी शाळेजवळ बोलावले होते. त्यानंतर आरोपीने त्या मुलाला त्याच्या घराकडे न नेता होंडा शाईन बाईकवर बसवून एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या तुरीच्या शेतात नेले आणि तेथे त्याच्यावर अत्याचार केला. सदर मुलगा आणि आरोपी हे दोघे एकाच गावातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. अत्याचार केल्यानंतर आरोपीने मुलाला या घटनेची वाच्यता केल्यास शाळेत येऊन मारण्याची धमकी दिली होती. घरी गेल्यानंतर मुलाने ही माहिती आई-वडील आणि मित्राला सांगितली. त्यानंतर आईने धाडस करून बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे आरोपी शैलेशविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३७७ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पीएसआय उमेश मारोडकर यांनी केला, तर सरकारी पक्षाच्यावतीने शासकीय अभिवक्ता ॲड. सोनाली क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.
अमरावतीत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपीला १० वर्षांचा कारावास:जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
