तहसीलदारांनी माहिती अधिकारातील दुसऱ्या अपीलाची सुनावणी 52 दिवस उलटले तरी घेतली नाही
नांदेड(प्रतिनिधी)-माहिती अधिकारात नायब तहसीलदार धर्मदाय शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी माहिती दिली नाही. तहसील कार्यालयाकडे पाठविले. त्यांनी माहितीचे उत्तर दिले नाही. पहिले अपील केले. त्यांनीही उत्तर दिले नाही. आता माहिती अधिकारातील अपीलार्थी सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी माहिती आयुक्त खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांना पत्र देवून दुसऱ्या अपीलाची सुनावणी लवकर घ्यावी. माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
सरदार मनजितसिंघ जगनसिंघ करीमनगर यांनी 29 एप्रिल 2024 रोजी जन माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार धर्मादाय शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे माहिती अर्ज सादर केला. त्यामध्ये रिट याचिका क्रमांक 7345/2023 मध्ये गुरुद्वारा बोर्ड मालकीच्या जमिनी बाबत वरिष्ठांना काय अहवाल सादर केला याची माहिती मागीतली होती. त्याबद्दल उपजिल्हाधिकारी सामान्य तथा जनमाहिती अधिकारी यांनी सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांना पत्र दिले की, आपण ही माहिती तहसील कार्यालयाकडे मागू शकता. माहितीच्या अधिकारामध्ये अर्जदाराने चुकीच्या ठिकाणी अर्ज केला असेल तरी पण तो अर्ज संबंधीत कार्यालयास वर्ग करणे ही त्या कार्यालयाची जबाबदारी आहे.
त्यानंतर सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी 4 जुलै 2024 रोजी जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार महसुल यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज केला. पण त्यांनी काही उत्तर दिलेच नाही. तेंव्हा जगनसिंघ यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी प्रथम अपीलय अधिकारी तथा तहसीलदार नांदेड यांच्याकडे अपील केले. आता त्या पहिल्या अपीलाला 52 दिवस उलटले आहेत. तरी तहसीलदारांनी सुनावणीही घेतली नाही तर निकाल कुठून देतील. सरदार मनजितसिंघ यांनी लिहिल्याप्रमाणे कायद्याला केराची टोपली दाखवली आहे.
माहिती आयुक्तांना विनंती करतांना सरदार मनजितसिंघ यांनी दुसऱ्या अपीलाची सुनावणी त्वरीत घ्यावी आणि निकाल द्यावा असे म्हटले आहे. माहिती आयुक्तांच्या निर्णयानंतर मला तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुध्द उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करायची आहे असेही लिहिले आहे.
Post Views: 54