![]()
ईद-ए-मिलादुन्नबी व हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद येथील ऐतिहासिक दरगाह हजरत ख्वाजा जैनोद्दीन शिराजी येथे पवित्र पैरहन मुबारक (पवित्र पोशाक) च्या जियारतची तयारी पूर्ण झाली आहे. या वर्षी सुमारे १० ते १२ लाख भाविक जियारतसाठी येण्याचा अंदाज दरगाहचे अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी यांनी व्यक्त केला आहे. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांचा हा पवित्र पोशाक गेल्या ७०१ वर्षांपासून खुलताबाद येथील दरगाहमध्ये अतिशय सुरक्षितपणे काचेच्या पेटीत जतन करून ठेवण्यात आला आहे. बावीस ख्वाजा दरगाहमध्ये ‘पैरहन मुबारक’, तर बाबा बुरहानोद्दीन यांच्या दरगाहमध्ये ‘मुह-ए-मुबारक’ (मिशीचे पवित्र केस) असून, दोन्ही ठिकाणी एकाच वेळी जियारत आयोजित केली जाते. बुधवारी (२६ ऑगस्ट) ईद-ए-मिलादुन्नबी साजरी होत आहे. भाविकांची संभाव्य प्रचंड गर्दी लक्षात घेता दरगाह कमिटीने मंगळवार, २५ ऑगस्टच्या रात्री ९ वाजेपासूनच जियारत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जियारत बुधवारच्या उशिरा रात्रीपर्यंत सलग सुरू राहील. भाविकांसाठी विशेष सुविधा पुरातत्व विभागाकडून भाविकांच्या रांगेसाठी दीड किलोमीटरपर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. दरगाह परिसरात रंगरंगोटी, रोषणाई व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. रांगेचे नियोजन व भाविकांच्या मदतीसाठी स्थानिक महाविद्यालयांतील १०० ते १५० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून तैनात असतील. गर्दी टाळण्यासाठी येण्या-जाण्यासाठी दोन वेगळे रस्ते तयार करण्यात आले असून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
