Chandrakant Khaire Accuses Ambadas Danve Ticket Sabotage Shiv Sena Thackeray | संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात ठिणगी: भाजपला जिंकवण्यासाठी अंबादास दानवेनी महिलांचे तिकीट कापले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप – Chhatrapati Sambhajinagar News



महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. “भाजपला निवडणूक सोपी जाव

.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे भाजपसह शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आता ठाकरे गटातही तिच स्थिती पाहायला मिळत आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरे गटातील अनेक निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. आज अनेक महिलांनी चंद्रकांत खैरे यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी काही महिलांना अश्रू अनावर झाले होते. “आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी काम केले, मग आमचे तिकीट का कापले?” असा जाब त्यांनी खैरेंना विचारला. यावर हतबल झालेल्या खैरेंनी या सर्व गोंधळाचे खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडले.

चंद्रकांत खैरेंचा दानवेंना निर्वाणीचा इशारा

अंबादास दानवे यांच्या कार्यपद्धतीवर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीका केली. “अंबादास दानवे हे सर्व काही ठरवून करत आहेत. मी या शहरात पक्ष उभा केला, स्वतःचा पैसा खर्च केला. पण आता मलाच अंधारात ठेवले जात आहे. रशीद मामूंसारख्या बाहेरच्या लोकांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला जात आहे. आता पाहाच मी काय करतो,” असा निर्वाणीचा इशारा खैरे यांनी अंबादास दानवे यांना दिला.

रशीद मामूंच्या उमेदवारीवरून मोठा राडा

काँग्रेसमधून आलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांच्या उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे अधिकच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील शिवसेना भवनात रशीद मामू यांचा प्रवेश होत असतानाच खैरेंनी त्यांना दारात अडवून, “तुला उमेदवारी मिळू देणार नाही,” असे सर्वांदेखत सुनावले होते. मात्र, खैरेंचा विरोध डावलून अंबादास दानवे यांनी रशीद मामूंना तिकीट मिळवून दिले.

“मी मामूच्या प्रचाराला अजिबात जाणार नाही. या ‘टीकोजीराव’ दानवेंनी सर्व काही स्वतःच्या मनाने केले आहे. आज ‘सामना’त यादी पाहिली, मला साधे विचारलेही नाही. हा माझा अपमान आहे,” अशा शब्दांत खैरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

भाजप आणि शिंदे गटातही कार्यकर्त्यांचा संताप

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आज दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ‘तांडव’ केले. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली.

दुसरीकडे, तिकिट वाटपावरून झालेली नाराजी केवळ भाजपच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेतही पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी तिकीट नाकारल्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “ज्यांनी आम्हाला कालपर्यंत गद्दार म्हटले, त्यांच्यासाठी आम्हाला बाजूला केले जात आहे,” असा संताप व्यक्त करत सोनवणे यांनी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *