![]()
भाजपला महापालिका निवडणुकीत सुरुवातीलाच मोठे यश मिळाले असून राज्यभरातून पक्षाचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कल्याण-डोंबिवली महापालिकेतून या विजयाचा श्रीगणेशा झाला असून, तेथील तीन प्र
.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने विजयाची दमदार ‘हॅट्रिक’ साधली आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून रेखाताई चौधरी, प्रभाग क्रमांक 26-क मधून आसावरीताई केदार नवरे आणि प्रभाग क्रमांक 26-ब मधून रंजना मीतेश पेणकर यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या तिन्ही महिला उमेदवारांच्या बिनविरोध विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत विजयाचा आनंद व्यक्त केला. मतदानापूर्वीच तीन जागांवर विजय मिळवून भाजपने या महापालिकेत आपली पकड मजबूत केल्याचे यावरून दिसून येत आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पक्षाने निवडणुकीपूर्वीच दोन जागांवर विजय निश्चित केला आहे. प्रभाग क्रमांक 1 अ मधून भाजपच्या उज्ज्वला रणजितराजे भोसले यांचा एकमेव अर्ज वैध ठरला असून, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या पत्नी असलेल्या उज्ज्वला भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक 6 ‘ब’ मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. या दोन जागांच्या विजयामुळे धुळे महापालिकेत भाजपने आपले खाते दिमाखात उघडले आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रभागातून महाविकास आघाडीचे (शेकाप) उमेदवार रोहन गावंड यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरवण्यात आला. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने नितीन पाटील यांचा विजय निश्चित झाला असून, पनवेलमध्ये भाजपने मतदानापूर्वीच विजयाचे खाते उघडले आहे.
