![]()
स्वच्छता कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेताना आयुक्त सौम्या शर्मा-चांडक.
अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये आणि हातगाड्यांमधून निर्माण होणाऱ्या कचरा व्यवस्थापनाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदारांना कंटेनर उपलब्ध करून देण्यासोबतच अशा व्यावसायिक ठिक
.
आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हॉटेल, रेस्टॉरंट चालक, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत हॉटेल वेस्ट मॅनेजमेंटसह बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचाही आढावा घेण्यात आला. हॉटेल, खानावळी, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यवसाय, कॅन्टीन, होस्टेल, हॉकर्स आणि हातगाडी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात शिजवलेले अन्न, किचन वेस्ट तसेच ओला व सुका कचरा निर्माण होतो.
सदर कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि स्वच्छ भारत अभियानच्या नियमानुसार केली जात नसल्याच्या तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या आहेत. यामुळे सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
बैठकीतील निर्णयानुसार, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सर्व मोठ्या कचरा उत्पादक आस्थापनांना (बल्क वेस्ट जनरेटर) त्यांच्या आस्थापनांमधून निघणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देणे बंधनकारक असेल. हॉटेल वेस्ट आणि किचन वेस्टसाठी स्वतंत्र कंटेनर ठेवणे अनिवार्य आहे. तसेच, प्लास्टिक ग्लास, डिस्पोजेबल साहित्य यांसारख्या सुक्या कचऱ्यासाठीही स्वतंत्र कंटेनर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी हॉकर्स झोनमध्ये छोटे हातगाडीधारक अन्नपदार्थ विकतात, त्या जागा निर्धारित करून तेथे मोठे ड्रम ठेवण्याची व्यवस्था हॉटेल वेस्ट मॅनेजमेंटच्या कंत्राटदारांनी करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. कचरा इतरत्र टाकल्यास नागरी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संबंधित आस्थापनांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला.
व्यावसायिक भागात मनपाद्वारे दिवसातून दोन वेळा घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा संकलन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंगल कार्यालये आणि लॉन्स येथे कार्यक्रमाच्या दिवशी हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट करणारे कंत्राटदार (गोविंदा नागरिक सेवा सहकारी संस्था) यांनी दिवसातून एक वेळा वाहन पाठवून हॉटेल वेस्ट आणि त्याअनुषंगाने निर्माण झालेला कचरा संकलित करावा, असे ठरवण्यात आले.
भाजी मंडईतून निर्माण होणारा ग्रीन वेस्ट तसेच मंदिरांमधून निर्माण होणारे निर्माल्य उचलण्याची जबाबदारीसुद्धा याच गोविंदा नागरिक सेवा सहकारी संस्थेची असेल.
