Amravati Municipal Elections: Congress expelled from two municipalities | अमरावती पालिका निवडणूक: काँग्रेस दोन नगरपालिकांतून हद्दपार: भाजपने 102 जागा जिंकत वर्चस्व राखले – Amravati News



अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे यश मिळवले. भाजपने सहा नगराध्यक्षपदांसह सर्व १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक निवडून आणले, तर काँग्रेसला दोन नग

.

जिल्ह्यातील सर्व १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने एकूण १०२ जागा जिंकल्या आहेत. या तुलनेत काँग्रेसला ७९ जागांवर विजय मिळवता आला, ज्यामुळे काँग्रेस भाजपपेक्षा २३ जागांनी मागे राहिली. धामणगाव रेल्वे येथे भाजपने सर्वच्या सर्व २० जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. त्याखालोखाल २६ सदस्यीय वरुडमध्ये भाजपने १८ जागा पटकावल्या. तसेच, चांदूर रेल्वे आणि शेंदुरजनाघाट या २० सदस्यीय नगरपालिकांमध्ये भाजपने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या.

भाजपने ४१ सदस्यीय अचलपूरमध्ये ९, चिखलदऱ्यात ८, मोर्शी आणि अंजनगाव सुर्जीत प्रत्येकी ६, दर्यापूर व धारणीत प्रत्येकी ४, नांदगाव खंडेश्वरमध्ये ३ आणि चांदूर बाजार येथे २ जागा मिळवल्या. दुसरीकडे, काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा दर्यापूरमध्ये जिंकल्या. त्याखालोखाल १५ जागा अचलपूरमध्ये, १२ चिखलदरा येथे, ९ अंजनगाव सुर्जीत आणि ८ धारणीत मिळवल्या. दर्यापूर, चिखलदरा आणि धारणीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागा सभागृहातील एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक आहेत. अचलपूरमध्ये १० अपक्षांची साथ मिळाल्यास काँग्रेस तेथेही आपले प्राबल्य सिद्ध करू शकते.

काँग्रेसला मोर्शीत ६, नांदगाव खंडेश्वरमध्ये ५, चांदूर रेल्वेत ४, वरुडमध्ये २ आणि चांदूरबाजारमध्ये एक जागा मिळाली. मात्र, धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाट या दोन नगरपालिकांमध्ये काँग्रेसला आपले खाते उघडता आले नाही.

मोर्शी नगरपालिकेत नगराध्यक्षपद शिंदे गटाच्या शिवसेनेने जिंकले असले तरी, नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीत येथे अत्यंत विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. येथे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन १२ जणांचा गट सहज तयार करू शकतात. याउलट, महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपचे ६, शिंदे सेनेचे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि प्रहारचा एक असे मिळून ११ सदस्य होतात. मोर्शीतील सत्ता स्थापनेचा खेळ रोडे गटाच्या एका सदस्याच्या भूमिकेवर अवलंबून असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *