![]()
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बागलिंगा गावात एक लघु जलसिंचन प्रकल्प (धरण) आकार घेत आहे. या प्रकल्पामुळे बागलिंगासह १४ गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे, ज्यामुळे हे छोटेसे गाव मेळघा
.
मेळघाटात मुसळधार पाऊस पडत असला तरी, पाणी साठवणुकीच्या ठोस योजनांअभावी आदिवासी गावांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, या धरणामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारा हा लघु जलप्रकल्प मुख्य अभयारण्यापासून ८.५ किलोमीटर अंतरावर आहे.
मोठ्या धरणांच्या तुलनेत हा प्रकल्प लहान असला तरी, यात पाणी साठवून एकूण १४ गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे. याशिवाय, लगतच्या गावातील शेतीलाही याचा फायदा होईल, असे बागलिंगा गावाच्या सरपंच निर्मला धांडेकर यांनी सांगितले. प्रकल्पासाठी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली शेतजमीन सरकारने संपादित केली असून, शेतकऱ्यांना योग्य मोबदलाही मिळाला आहे.
या प्रकल्पाची सुरुवात २००९ साली झाली असून, राज्य वन्यजीव मंडळानेही याला परवानगी दिली आहे. येथे खोदकाम करून एक भव्य तलाव निर्माण करण्यात आला आहे, ज्यात आता पावसाळ्यात पाणी साचले आहे. प्रकल्पाच्या खालच्या बाजूला पाणी शुद्धीकरण केंद्राद्वारे प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवले जाईल. बागलिंगा ग्रामपंचायत अंतर्गत लगतच्या १४ गावांना पाणीपुरवठा केला जाईल, असे सरपंच धांडेकर यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. बागलिंगा गावात जलशुद्धीकरण केंद्राचे काम वेगाने सुरू असून, पाणी साठवणुकीसाठी एक मोठी टाकीही बांधली जात आहे. यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, वर्षभरात या प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होतील.
या प्रकल्पातून बागलिंगा, चिचखेडा, कुलंगणा, मोझरी, वस्तापूर, सोमवारखेडा, मलकापूर, रामटेक, डोमनबल्ला, हरदामल, चिवाती, बदनापूर आणि कालापाणी या १४ गावांना पाणीपुरवठा केला जाईल.
