[ads1]
![]()
आकाशपाळणा उभारणीच्या ना-हरकत परवान्यासाठी लाचेची मागणी करून तडजोडीअंती 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या लाच प्रकरणात तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने सातारा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका 38 वर्षीय व्यावसायिकाने सातारा शहरातील आळूचा खड्डा येथे आकाशपाळणा लावण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात ना-हरकत परवान्यासाठी अर्ज केला होता. परवान्याच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलिस हवालदार दीपक पोळ यांना भेटले असता, त्यांनी पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने नाईलाजाने 15 हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम दोन दिवसांत देण्याचे सांगितले. त्यानंतर उर्वरित 15 हजार रुपयांसाठी हवालदार पोळ यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने 23 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, हवालदार दीपक पोळ यांनी पोलिस निरीक्षकांसाठी व स्वतःसाठी तडजोडीअंती 11 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याच पडताळणी दरम्यान पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनीही या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. त्यानंतर काल दि. 24 सप्टेंबर रोजी सातारा येथील राजवाडा परिसरातील जुना दवाखाना येथे एसीबीने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार दीपक पोळ याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad