![]()
वस्त्रदालनाच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील चार लाख 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वस्त्रदालनाच्या मालकांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात नवल टेक्सटाईल मार्केट हे वस्त्रदालन आहे. वस्त्रदालनाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी गज उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील चार लाख 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी (3 जुलै) मध्यरात्री घडली. सकाळी वस्त्रदालन उघडल्यानंतर रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी वस्त्रदालनातील दूरचित्रवाणी संचाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महिलेला पट्ट्याने मारहाण कामावर जाण्यास सांगितल्याने एकाने पत्नीला चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याची घटना लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी सूरज नंदू सकट (वय 27), किरण कवरे (दोघे रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी कांचन सूरज सकट (वय 23) हिने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज हा 2 जून रोजी दुपारी घरी झोपला होता. त्या वेळी पत्नीने त्याला कामावर जाण्यासाठी झोपेतून उठविले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. पतीने तिला चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. साथीदाराने तिला शिवीगाळ केली. पोलिस हवालदार काळे तपास करत आहेत.
पुण्याच्या उरुळी देवाचीमध्ये कापड दुकानात चोरी:खिडकीचे गज उचकटून पाऊणपाच लाख लंपास
