![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 24 तास शिल्लक असताना, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच चिघळला आहे. भाजपच्या पाचव्या प्रस्तावात शिवसेनेच्या ताब्यातील 7 महत्त्वाच्या जागा भाजपकडे गेल्याची माहिती मिळत
.
शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपासाठी आतापर्यंत नऊ बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. भाजपच्या ताज्या प्रस्तावानुसार, जंजाळ समर्थकांचे वर्चस्व असलेले आणि शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जाणारे 7 प्रभाग भाजपला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. हे तेच प्रभाग आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. हा अन्याय सहन न झाल्याने राजेंद्र जंजाळ कार्यालयातून रडत बाहेर पडले. त्यांचे अश्रू पाहून कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट “युती तोडा, स्वबळावर लढा” अशा घोषणाबाजी करत, भाजपला जास्त जागा सोडण्यापेक्षा युती तोडून स्वतंत्र लढण्याची मागणी केली.
शिरसाटांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा वेढा
उद्या (मंगळवारी) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये घबराट आणि संताप आहे. जंजाळ आपल्या समर्थकांसह पालकमंत्र्यांच्या घरी पोहोचले. यावेळी शिरसाटांना अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे. एकीकडे भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शेवटचा प्रस्ताव देऊन चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे, तर दुसरीकडे आपल्याच सैनिकांची मनधरणी करताना शिरसाटांची दमछाक होत आहे.
कोणावरही अन्याय होणार नाही, शिरसाटांची ग्वाही
वाढता तणाव पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घराबाहेर येत संतप्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “भाजपचा प्रस्ताव आला आहे, हे खरे आहे. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. शिवसैनिक हा लढणारा असतो, त्यामुळे मनात गैरसमज ठेवू नका. आपण सर्व मिळून सन्मानजनक मार्ग काढू.”
लाडकी बहीण म्हणता, मग न्याय का नाही?
प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक असलेल्या शारदा घुले यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आल्याचे समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.”एकनाथ शिंदे साहेब आम्हाला ‘लाडकी बहीण’ म्हणतात, पण एका लाडक्या बहिणीला पक्षात न्याय मिळत नाही का? पैसे घेऊन तिकीटं विकण्यात आली आहेत,” असा खळबळजनक आरोप घुले यांनी केला.
यावेळी शारदा घुले पक्ष कार्यालयात तीन-चार तास ठाण मांडून बसल्या होत्या. माझे काही बरे-वाईट झाले, तर हे कार्यालय जाळून टाका. मला हार्ट अटॅक आला, तर त्याला हे नेतेच जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला.
राजेंद्र जंजाळ यांची निवडणुकीतून माघार
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी भाजपसोबतच्या जागावाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून भाजपला जागा सोडल्या जात आहेत,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. त्यांनी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या युतीच्या अंतिम बैठकीकडेही पाठ फिरवली असून, त्यांना या बैठकीचे साधे निमंत्रणही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
