![]()
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची माहिती पुढे आली आहे. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने यासंबंधी आंबेडकरांशी चर्चाही केली आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या पोटात गोळ
.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले आहे. विरोधी बाकावरील काँग्रेसला समाधानकारक जागा मिळाल्यात. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची प्रचंड हाराकिरी झाली आहे. यामुळे काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगलाच जोर लावेल असा अंदाज बांधला जात आहे. त्यानुसार, देशातील या सर्वात जुन्या पक्षाची पाऊलेही पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याचा प्रयत्न चालवल्याची माहिती पुढे आली आहे.
काँग्रेसने ठेवला आंबेडकरांपुढे युतीचा प्रस्ताव
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये सध्या आघाडीची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने यासंबंधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेत त्यांच्यापुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला आंबेडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईतील अनेक भागांत आंबेडकरवाद्यांचे प्राबल्य
ठाकरे व मनसेने मुंबईत एकत्र येण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेस वंचितशी आघाडी करून धर्मनिरपेक्ष मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी काँग्रेसने दलित व वंचितांच्या मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या मागे वैचारिक संघटना व त्यांच्या समर्थकांची मोठी ताकद आहे. मुंबईच्या काही भागांत त्यांचे प्राबल्यही आहे. त्यामु्ळे पक्षाला त्याचा फायदा होईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. विशेषतः या आघाडीद्वारे महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीला तगडे आव्हान देता येईल, असा व्होराही काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत रंगणात तिरंगी सामना
काँग्रेस व आंबेडकरांच्या भेटीत केवळ जागावाटपच नव्हे तर मुंबईतील प्रदूषण, नागरी सुविधा व महापालिकेतील कथित भ्रष्टाचारासह स्थानिक प्रश्नांना हात घालण्याच्या मुद्यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबईतील आपला पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी वंचितला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती विरुद्ध काँग्रेस आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
