संभाजीनगरसह 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांचा आज निकाल:सकाळी 10 वाजता मतमोजणीस होईल सुरुवात




छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी उत्साहात मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६८.२८% मतदान झाले. सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या जिल्ह्यांतील १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ गण आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ गटांसाठी एकूण ७,४३८ उमेदवाराचे भवितव्य येत्या काही तासांत ठरणार आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये अटीतटीचा लढा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात ६८.३५% मतदान झाले. सोलापूरमध्ये ६५.९०% आणि सांगलीत ६९.७६% मतदान झाले आहे. या १२ जिल्ह्यांमधील एकूण २ कोटी ७ लाख मतदारांपैकी सुमारे १ कोटी ४१ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदारांची संख्या ७४ लाख, तर महिला मतदारांची संख्या ६७ लाखांच्या वर आहे. रत्नागिरीत मतदानाची टक्केवारी घटली एकीकडे काही जिल्ह्यांत मतदानाचा ७० टक्क्यांचा टप्पा ओलांडला असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र केवळ ५५.७९% मतदान झाले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ६१.९८% मतदान झाले असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथील मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे इथल्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोल्हापूर आणि परभणीत सर्वाधिक चुरशीचा लढा या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला होता. कोल्हापूर जिल्ह्याने ७४.४५% तर परभणी जिल्ह्यातही ७४.८९% इतके भरघोस मतदानासह राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर (७२.६९%) आणि रायगड (६९.९१%) या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे. आमदारपुत्राला मतदान कक्षात प्रवेश दिला; तिघे निलंबित आ.विलास भुमरे यांनी मुलाला मतदान कक्षात नेल्याप्रकरणी ३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आले. पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथील मतदान केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप देवराव नरवडे, मतदान अधिकारी संगीता नामदेव केदार, होमगार्ड पथकाच्या रेणुका सुरेश बोंबले अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी चौकशीचेही आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *